मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.

मुंबई -  करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्यात आले आले आहे. त्यामुळे रोजच्या रोजगारांवर पोट भरणार्‍या अनेक कामगारांसमोर रोजच्या जेवणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 
महाराष्ट्रातील जनतेला धान्याऐवजी थेट पीठ कसे मिळेल याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरु असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यातील जनतेसाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. थोरात यांनी सांगितले की, संपूर्ण लॉकडाऊनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. तसंच, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडवू नका अशा सूचना आम्ही राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरू आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान शेतीच्या कामांवर परिणाम होऊ नये यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. याबाबत बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, ’शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशीन येथे आले आहेत. त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल. तशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनला इंधन दिले जाईल, असे थोरातांनी सांगितले. दरम्यान, कोरोनामुक्तीनंतरच रेडीरेकनर दर जाहीर करण्यात येतील, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. दरवर्षी मार्चअखेरीस सरकारकडून रेडीरेकनर दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या 15 दिवसांपासून महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर हे दर जाहीर करण्यात येतील, असे देखील बाळासाहेब थोरातांनी सांगितले.



चौकट . . .
करोनाचे संकट दूर झाल्यावर रेडीरेकनर दर जाहीर होणार
सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नसून कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.